‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ अजित पवारांच्या विधानावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी….”, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं होतं. त्यात अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर भाष्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले होते, “आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिल्लोमध्ये बोलताना सांगितलं की, “सर्वांनी माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजं. कारण, छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी स्वराजासाठी त्याग केला. संभाजी महाराजांवर औरंगाजेबाने अत्याचार केले, तरीही धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही.”

“संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सारख्यांनी असं बोलणं योग्य नाही. सर्व माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजं. कारण, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी टीका केली होती. पण, अशा प्रकारचं वक्तव्य निंदाजनक आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.